कन्नड साहित्यातील महान ‘पर्व’ संपले, एस. एल. भैरप्पा यांचे निधन

ख्यातनाम कन्नड साहित्यिक आणि विचारवंत ‘पद्मश्री’ एस. एल. भैरप्पा यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी बंगळुरूतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भैरप्पा यांच्या निधनाने कन्नड साहित्यातील महान ‘पर्व’ संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

संतशिवर लिंगण्णय्या तथा एस. एल. भैरप्पा यांचा जन्म 26 जुलै 1934 रोजी कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात झाला होता. आधुनिक कन्नड साहित्यातील प्रमुख कादंबरीकारांपैकी ते एक होते. तीन दशकांहून अधिक काळ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक राहिलेल्या भैरप्पा यांनी 1958 मध्ये ‘भीमकाया’ ही पहिली कादंबरी लिहिली. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी जवळपास 25 कादंबऱया लिहिल्या. पर्व, आवरण, वंशवृक्ष, मंद्र, काठ, दाटू, तंतू, अंशू, गृहभंग, सार्थ अशा या त्यांच्या कादंबऱयांना वाचकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यांच्या कादंबऱयांचे मराठी, हिंदी, इंग्रजीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद झाले. तब्बल 25 वर्षे कन्नडमधील ते बेस्ट सेलर लेखक होते. त्यांच्या अनेक कादंबऱयांवर चित्रपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती झाली.

भैरप्पा यांना साहित्य सेवेसाठी अनेक सन्मान मिळाले. ‘मंद्र’ (2001) कादंबरीसाठी त्यांना प्रतिष्ठsचा ‘सरस्वती सन्मान’ मिळाला. याशिवाय साहित्य अकादमी, पद्मश्री (2016) आणि पद्मभूषण (2023) यांसारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले.

भैरप्पा यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद करताना मला त्यांचा सहवास लाभला. तब्बल 40 ते 42 वर्षे माझा त्यांच्याशी संवाद होता. 2018 साली शेवटची कादंबरी आली. त्यानंतर त्यांनी लेखन बंद केले. तरीही त्यांच्याशी संपर्क होता. अडचणीच्या वेळी त्यांच्याशी हक्काने बोलू शकत होते. त्यांच्या जाण्यानं घरातील व्यक्ती गेल्यासारखं वाटतंय, अशी भावना मराठी अनुवादक उमा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही भैरप्पा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ‘हिंदुस्थानी साहित्यावर आपली विशेष छाप पाडणाऱया भैरप्पांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. आपल्या लेखणीने मिथकांपासून ते आजच्या काळापर्यंतच्या विषयांना समर्थपणे हाताळणाऱया आणि कित्येक पिढय़ांचे साहित्यिक संगोपन करणाऱया या ज्येष्ठ लेखकाला विनम्र आदरांजली, असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.