Ratnagiri News – लांजा येथे सागाची अवैध तोड प्रकरणी सात जण ताब्यात, वनविभागाची कारवाई

लांजा तालुक्यातील कुर्णे येथील राखीव जंगल क्षेत्रात सागाच्या झाडांची अवैध तोड केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे राखीव वनक्षेत्रामध्ये वनविभागाचे पथक जंगल फिरती करीत असताना वनपाल आणि वनरक्षक यांना एकूण साग जातीची 7 झाडे तोंडल्याचे आढळून आले. यानंतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रूघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर, शुभम रवींद्र गुरव अशी संशयित आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण कुंभवडे येथील रहिवासी असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी लपवलेला मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे.

ताब्यात घेतलेल्या मालाची किंमत 3 लाख 14 हजार 790 रुपये आहे. वनाधिकारी यांनी हा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. गुन्ह्यात वापरलेली क्रेनही जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे, असे परिक्षेत्रीय वनअधिकारी प्रकाश सुतार यांनी सांगितले.