
यंदाच्या नवरात्रोत्सवावर परतीच्या पावसाचे सावट आहे. वीकेण्डला सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा दांडिया रंगल्यामुळे आयोजकांसह गरबा रसिकांच्या उत्साहावर पाणी फेरले. मैदानात चिखल साचल्यामुळे ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की काही सोसायटय़ा आणि आयोजकांवर ओढावली.
भलामोठा स्टेज, हजारोंचे पासेस, बड्या गायकांचे परफॉर्मन्स, तरुणाईची ओसंडून वाहणारी गर्दी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सेलिब्रेटींची हजेरी, लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट असा उत्साहाचा माहोल दरवर्षी मुंबईत नवरात्रोत्सवात असतो. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, घाटकोपर, वांद्रे, वरळी अशा विविध ठिकाणी मोठय़ा उत्साहात गरब्याचे आयोजन केले जाते. यंदा पावसामुळे या उत्सवावर काही प्रमाणात विरजण पडले आहे. रसिकांनी पाठ फिरवल्यामुळे काही आयोजकांचे आर्थिक गणित फिस्कटले आहे. बहुतेक सोसायटय़ांमध्ये केवळ विकेण्डला गरब्याचे आणि वेशभूषा स्पर्धांचे आयोजन केले जाते. पावसामुळे त्यांनाही फटका बसला.
बड्या आयोजकांची नामी शक्कल
खुल्या मैदानात उत्सवाचे आयोजन करणाऱ्या बड्या आयोजकांनी पावसामुळे पुरेशी काळजी घेतली होती. बोरिवली कोरा पेंद्र ग्राऊंड नं. 4 येथे उत्सवाचे आयोजन करणारे शो ग्लीट्झचे डायरेक्टर संतोष सिंग म्हणाले, हवामान विभागाने नवरात्रीत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे आम्ही एक लाख चौरस फुटाच्या संपूर्ण मैदानावर आम्ही जमिनीपासून दीड फूट उंच वूडन प्लॅटफॉर्म उभारले. गरबा खेळताना रसिकांचे पाय घसरू नये यासाठी या प्लॅटफॉर्मवर अॅण्टी स्लीप आणि पाणी शोषूण घेणारी मॅट टाकली. त्यामुळे आमच्याकडे पहिल्या दिवसापासून हाऊसफुल्ल गर्दी आहे.
आजपासून तीन दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नवरात्रीत 29, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेश वेबसाईटवर जारी केला आहे. मात्र गरबाप्रेमींना आवाजाच्या मर्यादेचे तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करावे लागणार आहे. शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.
मैदानातला गरबा लाखोंच्या पॉडमध्ये
काही आयोजकांनी यंदा खुल्या मैदानाऐवजी प्रशस्त हॉलमध्ये गरबा आयोजित केला. गरबा क्वीन फाल्गुनी पाठक यंदा बीकेसीतील जिओ वर्ल्ड कॉन्व्हेन्शन सेंटर येथील प्रशस्त हॉलमध्ये परफॉर्म करत आहे. येथे यंदा गरबा पॉड म्हणजे फक्त 12 जणांच्या ग्रुपला स्वतंत्र गरबा खेळण्यासाठी तयार केलेले छोटे मंडप आहेत. त्यामुळे प्रचंड गर्दीत अनोळखी व्यक्तींसोबत गरबा खेळण्याऐवजी तुम्हाला तुमच्या ग्रुपसोबत गरबा खेळता येणार आहे. याचे एका रात्रीचे भाडे एक ते दीड लाख रुपयांपर्यंत आहे.
फॅन्सी ड्रेसवाल्यांचे नुकसान
नवरात्रोत्सवात घागरा, चनिया चोलीसारखे पारंपरिक ड्रेस तसेच वेशभूषा स्पर्धेसाठी लागणारे फॅन्सी ड्रेस भाड्याने घेतले जातात. यंदा पावसाचा मोठा फटका आम्हा व्यावसायिकांना बसला असून गतवर्षीपेक्षा 70 टक्के बुकिंग कमी झाल्याचे गोरेगावच्या ‘माय कॉझ्च्युम’च्या ज्योती यांनी सांगितले. पावसामुळे ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या महिलांचीदेखील गर्दी ओसरली आहे.