
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा टॅप रस्त्यावर सिंधुदुर्गहून रत्नागिरीकडे येणार्या कारचा अपघात झाला. मार्गफलक न दिसल्याने कारने अचानक रस्त्यावरील कठड्याला धडक दिली आणि गाडी रस्त्यावर पलटी होऊन जागेवरच पेटली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
डॉ. मिहिर मुरलीधर प्रभुदेसाई (39) हे आपल्या कारने रत्नागिरीत येत होते. हातखंबा- पाली परिसरात रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे मार्गात बदल करण्यात आला आहे. मात्र, चालकाला रस्त्यावरील मार्ग बदलाचा सूचना देणारा फलक दिसला नाही. यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील गाडी थेट समोर असलेल्या दगडाच्या कठड्यावर जोरदार आदळली. यानंतर गाडी जागेवरच पलटी झाली आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. या अपघातात चालक डॉ. मिहिर प्रभुदेसाई जखमी झाले. तर त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने पाण्याच्या सहाय्याने गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामुळे रत्नागिरी-पाली मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.