मोफत औषध योजनेअंतर्गत कफ सिरपचे वाटप, सेवन करताच मुले बेशुद्ध; एकाचा मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर

मोफत औषध योजनेअंतर्गत खोकल्याच्या सिरपचे वाटप करण्यात आले होते. हे सिरप प्यायल्यानंतर पाच वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित कुटुंबांच्या तक्रारीनंतर बयानाच्या सामुदायिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. ताराचंद योगी यांनी सिरपचे सेवन केले. त्यानंतर त्यांची देखील प्रकृती बिघडली. राजस्थानमधील सिकर आणि भरतपूर येथे या घटना घडल्या.

बयाना ब्लॉकचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगेंद्र गुर्जर यांनी सांगितले की सिरपमध्ये समस्या असल्याचा संशय आहे. खबरदारी म्हणून, जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये या सिरपचा पुरवठा आणि वितरण करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील खोरी ब्राह्मणन गाव येथे 5 वर्षाचा मुलगा 29 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 च्या सुमारास खोकल्याचे औषध प्यायला आणि झोपी गेला. सकाळी तो बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्याला तात्काळ एसके रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे एसके हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. केके अग्रवाल यांनी सांगितले.

त्याच रात्री भरतपूरमध्येही तेच सिरप प्यायल्यानंतर तीन वर्षीय मुलगा बेशुद्ध पडला आणि त्याचे हृदयाचे ठोके अनियंत्रित झाले. त्याला जयपूरमधील जेके लोन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृतीही चिंताजनक असून सध्या तो व्हेंटिलेटरवर आहे.