
आपल्या धारधार लेखणीने समाजातील ज्वलंत चित्र समाजासमोर उभं करणारे मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंच गाजवण्यासाठी सज्ज झालं आहे. अभिनेते सयाजी शिंदे सखाराम बाइंडरच्या भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्यांदा 1972 साली हे नाटक प्रदर्शित झालं होतं. जवळपास 50 वर्षांनंतरही या वास्तववादी नाटकाची जादू चाहत्यांना भुरळ घालत आहे. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच शिवाय, मराठी मध्येही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे पुनः पुन्हा लोकांसमोर सादर केले गेले. तरुणांमध्ये या नाटकाची क्रेझ असून सर्वजन आतुरतेने नाटक प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.
स्त्री-पुरुष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे, विख्यात नाटटकार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असून विशेष म्हणजे तितक्याच ताकदीचे कसलेले गुणवान अभिनेते सयाजी शिंदे या नाटकातील सखाराम ही भूमिका करणार आहेत. सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे येथे या नाटकाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे. या निर्मिती संस्थेचं हे तिसरं नाट्यपुष्प आहे. दिल्लीमध्ये 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी नाटक प्रदर्शित होणार आहे. तर महाराष्ट्रात नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईमध्ये 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे असं सांगत, रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची भावना सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवली. आजच्या पिढीने हे नाटक पाहिलेले नाही या पिढीलाही हे नाटक या निमित्ताने जाणून घेता येणार आहे. सयाजी शिंदे यांच्या सोबत नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे, अभिजीत झुंजारराव हे कलाकार या नाटकात आहेत. या नाटकाचे निर्माते मनोहर जगताप तर कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. संगीत आशुतोष वाघमारे यांचे आहे. नेपथ्य सुमीत पाटील तर प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. रंगभूषा शरद सावंत तर वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे. सहाय्यक संकेत गुरव आहेत.