सून दागिने घालून जिमला जायची, धडा शिकवण्यासाठी सासूने जे केले ते ऐकून पोलीसही चक्रावले

सासूकडून सुनेचा होणाऱ्या छळाच्या घटना तर नेहमीच पहायला मिळतात. मात्र सासू-सुनेतील वादाची एक अनोखी घटना समोर आली आहे. सुनेला अद्दल घडवण्यासाठी सासूने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. सून दागिने घालून जिमला जात असल्याचा राग सासूला होता. याच रागातून सासूने चक्क चोराला सुपारी देऊन सुनेचे दागिने चोरायला सांगितले. चोरट्यांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात ही घटना घडली. पूजा नामक महिला दररोज दागिने घालून जिमला जायची. पूजाचे जिमला जाणे आणि दागिने घालून जाणे दोन्ही तिच्या सासूला पसंत नव्हते. यामुळे सुनेला धडा शिकवण्यासाठी सासू रेखाला एक योजना आखली.

सासूने गुन्हेगार अंकुरशी संपर्क साधत सुनेचे दागिने चोरण्यास सांगितले. त्यानुसार अंकुरने आपल्या दोन साथीदारांना सोबत घेऊन पूजाला जिमला जाताना रस्त्यात गाठलं. त्यानंतर आरोपी तिचे दागिने हिसकावून पसरा झाले. पूजाने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काल कारवाई सुरू करत तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींची चौकशी केली असता पूजाच्या सासूनेच सुनेला अद्दल घडवण्यासाठी दागिने चोरायला सांगितल्याचे उघड झाले. सत्य ऐकून पोलीसही चक्रावले.