सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव; सुटकेची मागणी

लेह-लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीत समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली जे आंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गीतांजली जे आंगमो यांना सोनम वांगचुक यांच्या अटकेला आव्हान दिले असून त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे.

सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून यालाच गीतांजली जे आंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत सुटकेची याचिका दाखल केली आहे. तसेच आपल्याला अद्याप अटकेची कॉपी देण्यात आलेली नाही आणि हे नियमांचे उल्लंघन आहे, असे गीतांजली यांनी म्हटले आहे. अटकेनंतर सोनम वांगचुक यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याचेही त्या म्हणाल्या.

लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांना सध्या राजस्थानच्या जोधपूर येथील तुरुंगात ठेवण्यात आलेले आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी त्यांच्या पतीवर सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याआधी बुधवारी गीतांजली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता, कायदा मंत्री अर्जुन मेघवाल आणि लेहच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. याचा फोटोही त्यांनी एक्सवर शेअर केला होता.

वांगचुक यांचा देशालाच नाही तर कुणालाही धोका नसल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच माझ्या पतीशी फोनवर बोलण्याचा किंवा अटक करून जिथे ठेवला आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटण्याचा व बोलण्याचा अधिकार मला नाही का? असा सवालही त्यांनी केला.