मोठी बातमी – सिंधुदुर्गात शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर आज (शुक्रवार) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कुडाळ-पिंगुळी येथून पर्यटनासाठी आलेल्या मनीयार कुटुंबातील आठ सदस्य समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. या दुर्घटनेत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला तर एका चिमुकलीला वाचवण्यात आले आहे. अद्याप चार जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

या दुर्घटनेत एका लहान मुलीचा जीव वाचवण्यात यश आले असून, तिला पुढील उपचारांसाठी शिरोडा उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने मनीयार कुटुंबाला एका क्षणात मोठा धक्का बसला आहे.

चार पुरुषांचा शोध सुरू

बुडालेल्यांपैकी उर्वरित चार लोक अद्यापही बेपत्ता आहेत. माहितीनुसार, हे चारही बेपत्ता सदस्य पुरुष असून, त्यात दोन तरुण आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

शोध मोहिमेत अडथळा

वेंगुर्ले शिरोडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे आणि बचाव कार्यात या चारही बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. समुद्रातील पाण्याचा प्रवाह आणि बदलती परिस्थिती यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत असले तरी, शोधकार्य वेगाने सुरू आहे.