एक दो एक दो जिंदाल बंदर फेक दो! मुरबे बंदराविरोधात पालघरमध्ये प्रक्षोभ, कंपनीच्या प्रवेशद्वारावर शेकडो नागरिकांचे आंदोलन

पालघर जिल्ह्यातील मुरबे बंदराविरोधात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. शेकडो गावकऱ्यांनी तारापूर एमआयडीसीमधील जेएसडब्ल्यू कंपनीवर धडक देत प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. एक दो एक दो जिंदाल बंदर फेक दो.., आधी पर्यावरण व स्थानिक मच्छीमारांच्या रक्षणाची हमी द्या, मगच ६ ऑक्टोबरला जनसुनावणी घ्या अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. नागरिकांच्या या प्रभोक्षाने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे.

जेएसडब्ल्यू कंपनी मुरबे येथे बंदर उभारत आहे. मात्र याला भूमिपुत्रांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र त्यानंतरही कंपनी हे बंदर उभे करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी आज जेएसडब्ल्यू कंपनीच्या तारापूर एमआयडीसीतील कारखान्यावर धडक देत प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

यावेळी मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष मोनालिसा तरे, सचिव प्रमोद आरेकर, खजिनदार सचिन पाटील, जितेंद्र मेर, सल्लागार जयेश गावड, सरपंच समिर मोरे, राजेंद्र वाडीकर, अंजली बारी, तृप्ती संखे, सिमा भोईर, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल तसेच गावकरी उपस्थित होते.