विमानाचे तिकीट गगनाला भिडले; मलेशिया, सिंगापूरपेक्षा मुंबई ते वाराणसीचे उड्डाण महाग

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांचे दिवाळे काढायचे ठरवलेले दिसते. देशांतर्गत विमान सेवा महागली आहे. दिवाळीत मुंबई, दिल्ली या प्रमुख शहरांतून लखनऊ, पाटणाला जायचे असेल तर 30 हजार रुपये विमानाच्या तिकिटासाठी मोजावे लागत आहेत. एकीकडे थायलंड, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग येथील प्रवास अवघ्या 17 हजार रुपयांपर्यंतच्या तिकिटांत करता येतो. थोडक्यात काय तर देशातील प्रवासापेक्षा सिंगापूर, मलेशियाला जाणे एकवेळ स्वस्त आहे, असेच म्हणावे लागले.

दिवाळीच्या सुट्टीत लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. सणाच्या निमित्ताने आपल्या गावी, शहरी परततात. या पार्श्वभूमीवर तिकिटांचे दर वाढवले जातात. विमान कंपन्यांच्या तिकीट दरवाढीचा फटका प्रवाशांना बसत आहे. वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या वेबसाईटवरून माहिती घेतल्यावर असे दिसून आले की, दिल्ली ते लखनऊ विमानाचे तिकीट 9 ऑक्टोबर रोजी 4200 रुपये आहे, ते 18 ऑक्टोबर रोजी 13618 ते 18738 रुपये आहे. दिल्ली ते पाटणा प्रवासासाठी 18 ऑक्टोबर रोजी 15248 ते 26072 रुपये तिकीट आहे. मुंबई ते लखनऊचे 18 ऑक्टोबरचे विमान भाडे 17401 ते 29466 रुपये एवढे आहे, तर याच दिवशी बंगळुरू ते लखनऊचे भाडे 16429 ते 23656 रुपये आहे.

मुंबई-अहमदाबाद विमानाचे तिकीट साधारणपणे 2500 ते 3500 रुपये एवढे असते. मात्र 18 ऑक्टोबर रोजी हेच भाडे 5078 रुपये ते 13936 रुपये एवढे वाढले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ झाली आहे. विमान कंपन्यांनी दुप्पट-तिप्पट दर वाढवले आहेत. वंदे भारत ट्रेनचे तिकीट मिळताना मुश्कील झाले आहे.

अशी आहे दरवाढ

  • दिल्ली-वाराणसी – 20,038 रुपये
  • दिल्ली-प्रयागराज – 19,654 रुपये
  • दिल्ली -कानपूर – 12,358 रुपये
  • मुंबई-वाराणसी – 29,604 रुपये
  • मुंबई-प्रयागराज – 20,403 रुपये
  • मुंबई-कानपूर – 20,404 रुपये

आंतरराष्ट्रीय दर

  • दिल्ली-बँकॉक – 8,750 रुपये
  • दिल्ली-दुबई – 11,308 रुपये
  • दिल्ली-मलेशिया – 13,315 रुपये
  • दिल्ली-सिंगापूर – 17,799 रुपये
  • दिल्ली-हाँगकाँग – 16,282 रुपये