शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या सुनावणी, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला मिळणार पूर्णविराम?

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. या सुनावणीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अंतिम निर्णय होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंधे गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांत होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मिंधे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात अंतरिम अर्जाद्वारे केली. त्या अर्जाची दखल घेताना न्यायमूर्ती सुर्य कांत यांच्या खंडपीठाने मूळ याचिकाही लवकर निकाली काढणार असल्याचे संकेत दिले. त्यावेळी 20 ऑगस्टला सुनावणी निश्चित केली होती. मात्र राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना वेळमर्यादा आखून दिली पाहिजे का, याबाबत राष्ट्रपतींनी मागवलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ स्थापन केले आहे. त्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा समावेश आहे. ते घटनापीठ 19 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंतचा वेळ घेणार होते. त्यामुळे शिवसेनेची सुनावणी 20 ऑगस्टऐवजी 8 ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलली होती.