
खासगी कंत्रादारांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजप सरकार मुद्दाम बेस्ट वाहतूक व्यवस्था संपवण्याच्या प्रयत्नात आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) खासगी बस ऑपरेटर्स सिटीफ्लो आणि नवकार ट्रेव्हल्ससोबत भागीदारी करून मेट्रो-३ (एक्वा लाइन) च्या सात प्रमुख भूमिगत स्टेशनांना जोडणारी फीडर बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यावरूनच आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
X वर पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “बेस्टला निधी देण्याऐवजी आणि नव्या बसेस ताफ्यात आणण्याऐवजी, भाजप सरकारने बेस्टचा बस ताफाच कमी केला आहे. बस ताफा कमी करण्याबरोबरच भाडेदर दुप्पट करून बसचा सर्वसामान्यांना परवडणारा प्रवासही मुंबईकरांच्या आवाक्याबाहेर नेण्यात आला आहे. मुंबईकरांचे हाल होत असताना मात्र खासगी कंत्राटदार नफा कमावत आहेत.”
ते म्हणाले, “आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात बेस्टचे भाडे स्थिर आणि परवडणारे ठेवले होते, तसेच २०२७ पर्यंत १०,००० इलेक्ट्रिक बस बेस्टच्या ताफ्यात आणण्याची आमची योजना होती. पण भाजप सरकारला मुंबईची खरी लाईफलाईन, बेस्ट संपवायची आहे, हे सत्य आहे. मेट्रो मार्गावरील रस्ते आणि पदपथाचे काम तातडीने पूर्ण करावे. शेवटच्या टप्प्यासाठी पुन्हा वाहनाची गरज भासतेय, हे अत्यंत लाजिरवाणं आहे. शेवटचा टप्पा चालण्यास योग्य असायला हवा.”