लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्यायाचे 410 कोटी पळवले

‘लाडकी बहीण योजने’मुळे सरकारच्या नाकीनऊ आलेले आहेत. तिजोरीत निधीच नसल्यामुळे आता सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर सरकारची नजर पडली असून लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारने पळवला आहे.

‘लाडकी बहीण योजने’चा वेळेवर हप्ता देण्यासाठी सरकारकडे निधी नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. त्याची कबुली खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारीच दिली होती. ‘लाडकी बहीण योजने’मुळे सरकारच्या नाकीनऊ आल्याचे वक्तव्य भुजबळ यांनी केले होते त्याची प्रचीती आज आली आहे. सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला आहे. त्यामुळे राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनुसूचित जाती घटकांकरिता पात्र लाभार्थ्यांसाठी हा निधी असणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. पण पुढच्या महिन्याचा निधी देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाला पुन्हा निधीची जुळवाजुळव करण्याचे आव्हान राहणार आहे.

यापूर्वी 746 कोटी पळवला

यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटी रुपयांचा निधी पळवला होता. आता पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला मारला आहे.