
‘देशात मुस्लिम समाजाची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून, यामागे पाकिस्तान आणि बांगलादेशातून होणारी घुसखोरी आहे,’ असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ‘घुसखोरीचा प्रयत्न मतदार यादीतही होत आहे. मात्र, जे हिंदुस्थानी नागरिक आहेत, तेच मतदान करू शकतील,’ असेही शहा यांनी सांगितले.
मुस्लिम समाजाची लोकसंख्या 24.6 टक्क्यांनी वाढली आहे, तर हिंदूंची लोकसंख्या 4.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. मुस्लिमांची लोकसंख्या प्रजननदरामुळे वाढलेली नाही, तर या लोकसंख्यावाढीचे कारण घुसखोरी आहे. हिंदुस्थानच्या दोन्ही बाजूंनी पाकिस्तान आणि बांगलादेशातून घुसखोरी होत आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या लोकसंख्येत मोठे बदल झाले,’ असे अमित शहा म्हणाले.
घुसखोर आणि निर्वासितांमध्ये फरक
‘पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी झाली. त्यांतील अनेकांनी हिंदुस्थानात आश्रय घेतला ते निर्वासित आहेत. पण हिंदुस्थानात वाढलेली मुस्लिमांची लोकसंख्या याचे कारण पाकिस्तान आणि बांगलादेशातून होणारी मुस्लिमांची घुसखोरी कारणीभूत आहे,’ असे शहा यांनी सांगितले.