कोल्हापुरात विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणीचं सत्र सुरूच; हातकणंगलेतील तळसंदे पाठोपाठ पेठ वडगाव येथील शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील एका शिक्षण संस्थेच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांकडून मारहाणीच्या अमानुष घटनेचे व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. आज दुसऱ्या दिवशीही याच तालुक्यातील पेठवडगाव परिसरातील एका शिक्षण संस्थेच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा असाच प्रकार सोशल मीडियातून समोर आला आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत नसले तरी काही विद्यार्थ्यांची गुंडगिरी प्रवृत्ती आणि दहशत माजविणारा हा प्रकार शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा आहे.

हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील शामराव पाटील शिक्षण संकुलातील निवासी लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना त्याच संस्थेतील मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांसह प्रशासनाकडूनही यांची गंभीर दखल घेण्यात आली .हा व्हिडिओ जुना असून त्यावेळी संबंधित विद्यार्थी व वसतिगृह निरिक्षकांवर कारवाई करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच दोन दिवसापूर्वी आणखी एका विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या वसतीगृह निरीक्षकालाही बडतर्फ केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे अशा घटना घडून नयेत याबाबत दक्षता घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कालचे तळसंदेचे प्रकरण काहीसे शांत झाले असतानाच विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटाकडून एका विद्यार्थ्याला शौचालयात लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण करतानाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तळसंदे गावा शेजारच्या पेठवडगावच्या एका शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी वसतीगृहातील हा प्रकार असल्याची चर्चा आहे.

हा व्हिडिओ कोणत्या शिक्षण संस्थेतील आणि कधीचा आहे याची शहानिशा करण्यात येत असली तरी वसतीगृहांमध्ये सर्रास रँगिग सुरू आहे की विद्यार्थ्यांच्या टोळ्यातून दहशत माजविण्याचे धडे गिरवले जात आहे? याला कोणाचा वरदहस्त लाभत आहे वा प्रोत्साहन मिळत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे

दरम्यान, आता हा व्हिडिओ जुना वा नवा हे पाहण्यापेक्षा, त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे बनले आहे. अशा घटनांमुळे शिक्षण संस्थांच्या वस्तीगृहांमध्ये विद्यार्थी किती सुरक्षित आहेत? पुढील पिढी गुंडगिरी करेल का याची भीती पालकवर्गात निर्माण झाली आहे. याची शिक्षण विभागाने अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन पोलीस व सामाजिक लोकप्रतिनिधींसह संयुक्त पाहणी करावी. अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.