सांगलीतील बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी पडून, दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम

सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज शहरांसह ग्रामीण भागातील विविध बँकांमध्ये 176 कोटी रुपये बचत, चालू व मुदतठेव स्वरूपात ठेवलेले 7,75,315 इतके खातेदार 10 वर्षे पुन्हा बँकेकडे फिरकले नसल्याने ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली आहे. अशा मयतांचे वारस किंवा जिवंत असलेल्या खातेदारांनी 31 डिसेंबरपर्यंत संबंधित बँकेशी संपर्क साधायचा आहे. ज्या बँकेत आपले खाते आहे, तेथे कागदपत्रे सादर करून रक्कम काढून घ्यावी. रिझर्व्ह बँकेने यासाठी दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीत बँकेला कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

रिझर्व्ह बँकेत पैसे जमा

– रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे खातेदाराने बचत, चालू व मुदतठेव अशा स्वरूपातील 10 वर्षांत खात्यावर कुठलाही व्यवहार केला नसेल तर ती रक्कम संबंधित बँकेने रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करावी लागते, अशी रक्कम मागणी करण्याचा अधिकार खातेदार किंवा मयत खातेदाराच्या वारसाला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खातेदारांना संबंधित बँकेशी संपर्क करून आपली रक्कम मागणी करण्यास तीन महिन्यांचा अवधी दिला आहे.

यामध्ये सर्वाधिक रक्कम ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,72,838 खातेदारांची 75.72 कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या 1,61,918 खातेदारांचे 33.54 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 44,939 खातेदारांचे 16.99 कोटी, आयसीआयसीआय बँकेच्या 96,917 खात्यांवर 16.15 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 1,616 खात्यांवर 8.77 कोटी, युनियन बैंक ऑफ इंडियाच्या 30,075 खात्यांवर 7.65 कोटी, रत्नाकर बँकेच्या 24968 खात्यांवर 5.8 कोटी तसेच इतर बँकांनीही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केली आहे.

जनजागृती मोहीम

– केंद्र सरकारच्या वित्त विभाग व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. बँकांमध्ये बचत खाते, चालू खाते व ठेव स्वरूपात असलेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळ दावा न केलेल्या म्हणजेच अनेक खातेदार खात्यावर असलेल्या रकमा काढण्यासाठी ते बँकेकडे फिरकले नाहीत. अशा स्वरूपातील रकमा परत मिळवण्यासाठीची जनजागृती व दावा मोहीम चालू आहे. यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारच्या वित्त विभाग व राज्यस्तरीय बँकर्स समितीने बँकांना दिलेले आहेत. त्याच्या अधीन राहून या मोहिमेअंतर्गत खातेदारांना त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून घेता येईल अथवा पुढे नूतनीकरण करून ठेवताही येतील.

ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी/ वारसांनी आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित केल्या जाणार असून, खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.