दिल्लीमध्ये उलथापालथ करण्याइतकी क्षमता आता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही – संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. त्यावरून फडणवीसांच्या भेटीवरून महाराष्ट्रात काही उलथापालथ होईल का असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

”फडणवीसांच्या दिल्ली भेटीवरून महाराष्ट्रात काय उलथापालथ होणार. आता उलथापालथ नोव्हेंबर महिन्यात होईल. आम्हाला अपेक्षा आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयात जो खटला सुरू आहे. जर तो न्याय मिळाला तर तो नक्कीच उलथा पालथ होईल. दिल्लीमध्ये उलथापालथ करण्याइतकी क्षमता आता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं. ” ज्यांनी शेतकऱ्यांचं कर्ज एका झटक्यात माफ केलं. ज्यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला जीवदान दिलं. त्यांना हतबल मुख्यमंत्री म्हणनं म्हणजे स्वत: किती लाचार, लोचट आहोत हे दाखवणं. या राज्यातलं सरकार जे आलेलं आहे ते भ्रष्ट पद्धतीने आलेलं आहे. त्यामुळे या सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्याला उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायचा अधिकार नाही. आता या सरकारचा फैसला न्यायालयात लागणार आहे. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एवढी आंदोलनं केली आहेत. जे बोलतायत त्यांचे डोळे फुटलेय किंवा कानाचे पडदे फाटलेय. हे सर्व अमित शहांच्या कंपनीचे लाचार नोकर आहेत. शिवसेना हा महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे त्यामुळे भाजपवाल्यांना त्यांची भिती वाटते” असे संजय राऊत म्हणाले.

कबुतर खान्यासंदर्भात जैन मुनींनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”कबुतर खान्यांसंदर्भात संविधानात असं काही म्हटलंय का की कबुतर खाने बंद करू नयेत, हटवू नये? लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, लोकांना अडचणीत आणणाऱ्या, आजार निर्माण करू शकणाऱ्या आहेत त्या हटवायलाच हव्या. मरिन लाईन्सला लोढांनी एक जिमखाना बनवलाय. त्यात जे मैदान आहे तिथे करावा ना कबुतरखाना. आम्ही देऊ तिथे येऊन कबुतरांना दाणे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा भुतदयावादी नेता नव्हता. उद्धव ठाकरे व बाळासाहेब यांच्यात तुम्ही भेदाभेद करू नका. उद्धव ठाकरे त्याच पक्षाचे पक्षप्रमुख आहे, असे संजय राऊत म्हणाले.