
पैशाच्या वादातून एका हातगाडी चालकाचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन मित्रांना अटक केली आहे. अंधेरीतील साकीनाका परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एहसान अली अन्सारी (47) हत्या झालेल्या हातगाडी चालकाचे नाव आहे.
अन्सारी भावासोबत साकीनाका येथील खैरानी रोडवरील अल्विन डिसोझा कंपाउंडमध्ये राहत होता. तो स्थानिक कंत्राटाखाली हातगाडी चालवत होता. 7 सप्टेंबर रोजी अन्सारी अचानक बेपत्ता झाला. त्याच्या भावाने साकीनाका पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी घाटकोपरमधील चेडा नगर परिसरात अन्सारीचा मृतदेह आढळला. यानंतर साकीनाका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.
तपासादरम्यान 7 सप्टेंबर रोजी अन्सारीचा खैरानी रोडवरील मदिना हॉटेलजवळ निसार अली, वाजिद अली आणि हक्किकत अली या तिघांशी कराराच्या पैशावरून वाद झाला होता. पोलिसांनी तिघांचाही माग काढला आणि शुक्रवारी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली.