निवडणुकीआधी लालू प्रसाद यादव यांना धक्का, IRCTC घोटाळ्याप्रकरणी आरोप निश्चित

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी व बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांच्यावर सोमवारी दिल्लीतील राउज एवेन्यू विशेष सीबीआय न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. या तिघांवरही फसवणूक, भ्रष्टाचार असे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांनी आयआरसीटीसीच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा केल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत न्यायालयाने यादव कुटुंबाला विधानसभा निवडणूकीआधी धक्का दिला. दरम्यान लालू प्रसाद यादव, राबडी देवी व तेजस्वी यादव यांनी ते कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाणार असल्याचे सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना 2004 ते 2009 या काळात हा कथित घोटाळा झाला. याप्रकरणी 18 मे रोजी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुली मिसा आणि हेमा यादव यांच्यासह 2008-09 मध्ये मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर, हाजीपूरमध्ये रेल्वेत नोकरी मिळालेल्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराने 1.05 लाख स्क्वेअर फुट जागेवर कथितपणे कब्जा केल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. याशिवाय सीबीआयने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे सचिव संजय यादव यांची दिल्लीत चौकशीही केली होती. तसेच लालू यांचे ओएसडी असलेले भोला यादव यांना सीबीआयने 27 जुलै रोजी अटक केली होती.