मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, सरकार निवडणुकीमध्ये व्यस्त; वडेट्टीवार यांची टीका

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र दिवाळी तोंडावर आलेली असताना अद्याप शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. ”अशा वेळी कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने उभं करण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून महायुती सरकार मात्र निवडणूकीच्या तयारीत व्यस्त आहेत, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचा 26 लाख हेक्टर जमिनीवरील शेतीला फटका बसला असून शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. त्याबाबत ट्विट करत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”बळीराजाच्या घरात दिवाळीला असणार अंधार, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतलं पाणी, उद्ध्वस्त झालेली घरं आणि थंड पडलेलं सरकार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. सप्टेंबर या एका महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांची २६ लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत, ५२ लाख हेक्टरवरील खरीप पिकं पाण्यात गेली आहेत. मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये सरकार व्यस्त आहे,बैठका सुरू आहेत. तोंडावर दिवाळी आली आहे, पण शेतकऱ्यांना आता कोण विचारत आहे… दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करणार अस सांगत होते.. अजूनही मदत मिळालेली नाही कसली दिवाळी? कुठून आणावे गोडधोड पदार्थ, मुलांसाठी कपडे? हे सरकार म्हणजे बडा घर पोकळ वासा आहे. किमान हेक्टरी ५०,००० मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे! दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे तर त्यांच्या आयुष्यात दिवाळी होईल”, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.