
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासह फिरायला जाण्याकडे अनेकांचा कल असतो. दिवाळी पर्यटन ही संकल्पना आपल्याकडे रुजली आहे. यंदा मात्र दिवाळी पर्यटनाकडे नागरिक सावधगिरीने वळताना दिसत आहेत. महागाई, टुर पॅकेजच्या वाढलेल्या किमती, आंतरराष्ट्रीय तणाव, टॅरिफचा फटका अशा काही बाबी पाहत सध्या लोकांनी सहलीचा विषय ऑप्शनला टाकलेला दिसतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळी सहलींमध्ये 40 ते 50 टक्के घट झाल्याचे टुरिस्ट कंपन्यांचे म्हणणे आहे.
आपल्याकडे सहकुटुंब सहलीला जाण्याचे दोन सीझन असतात. उन्हाळ्याची सुट्ट्या आणि दिवाळीची सुट्टी. सहामाही परीक्षा झाल्यावर दिवाळीची सुट्टी सुरू होते. या काळात बजेटनुसार देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय सहली निवडल्या जातात. तसे बुकिंग केले जाते. ज्या लोकांची देशातील प्रमुख ठिकाणे फिरून झाली आहेत ते सिंगापूर, थायलंड, दुबई अशा अल्प काळाच्या आंतरराष्ट्रीय सहलींपासून सुरुवात करतात. बजेट जास्त असेल तर स्वित्झर्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा मोठ्या सहलींकडे वळतात. यंदा मात्र सहलींसाठी इन्क्वायरी किंवा बुकिंगचे प्रमाण कमी झाले. यामागे महागाई आणि त्यामुळे वाढलेले पॅकेज दर हे कारण आहे. याविषयी महाराष्ट्र टुर ऑर्गनायझर्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वजित पाटील म्हणाले, महागाई हे कारण तर आहेच, पण अन्य कारणेही आहेत.
पहेलगाम हल्ल्यानंतर आमचा सीझन कोसळला होता. त्यातून सावरतोय तर एअर इंडिया विमान कोसळल्याची घटना घडली. युद्ध, अमेरिकेने लावलेले टॅरिफ अशी अनेक कारणे आहेत. लोकांच्या मनात भीती असते. परिणामी चौकशीचे कॉल्स आणि बुकिंग कमी झाले आहे.
उत्तरेकडे पुराचा फटका
- यंदा उत्तरेकडील सहलींना फटका बसल्याचे केसरी टुर्सचे शैलेश पाटील यांनी सांगितले. पाऊस, पुरामुळे उत्तरेकडील राज्यांत बुकिंग नाही. मात्र केरळ, गोवा, गुजरातला चांगली पसंती आहे. दुबई, सिंगापूर, थायलंड आदी टुर फुल्ल असल्याचे ते म्हणाले.
- अलीकडच्या वर्षांत हिंदुस्थानचा आंतरराष्ट्रीय प्रवासही वाढला असल्याचे दिसून येत आहे. यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम ही हिंदुस्थानी लोकांची प्रमुख पसंतीची ठिकाणे ठरली आहेत.




























































