
कुटुंबासोबत परदेशात जायचे म्हणून लुकआऊट नोटीसविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. राज कुंद्रा यांच्या कंपनीशी तुमचा काहीही संबंध नाही असे तुमचे म्हणणे असेल तर तुम्ही माफीचा साक्षीदार का होत नाही, असा सवाल मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने शिल्पा शेट्टीला विचारला.
आर्थिक फसवणूकप्रकरणी अडचणीत आलेल्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून कुठेही जाण्यास निर्बंध आहेत. परदेशात जाण्याची परवानगी मिळावी यासाठी दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. निरंजन मुंदरगी यांनी खंडपीठाला सांगितले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी कुंद्रा आहेत तर शेट्टी यांच्याविरुद्ध कोणताही विशिष्ट आरोप नाही. मुंदरगी म्हणाले की, शेट्टी यांनी चौकशीत सहकार्य केले आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना बोलावण्यात आले तेव्हा त्यांचे जबाब नोंदवले गेले. त्यावर न्यायमूर्ती म्हणाले की, तुम्ही कुंद्रा यांच्याविरुद्ध साक्षीदार का बनत नाही? तसेच राज कुंद्राच्या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा काहीही संबंध नाही हे राज कुंद्रा प्रतिज्ञापत्रावर सांगण्यास तयार आहेत का?