मध्य रेल्वे मार्गावर आज रात्री पुन्हा ब्लॉक, डोंबिवली स्थानकामध्ये पादचारी पुलाचा गर्डर टाकणार

मध्य रेल्वेने कर्जत यार्डमधील कामासाठी घेतलेल्या ब्लॉकपाठोपाठ डोंबिवली स्थानकात बुधवारी रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर रात्री 12.20 ते पहाटे 3.20 वाजेपर्यंत (3 तास) तसेच डाऊन आणि अप जलद मार्गावर मध्यरात्री 1.20 ते पहाटे 3.20 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. 12 मीटर रुंद पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

डोंबिवली स्थानकातील पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. बुधवारी रात्री तीन तास गर्डर लाँचिंगचे काम केले जाणार आहे. या काळात मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 11041, 22865 आणि 22538 या लांब पल्ल्याच्या गाड्या दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. तसेच गाडी क्रमांक 11020 आणि 18519 या अप मेल/एक्सप्रेस कल्याण-पनवेलमार्गे वळवल्या जातील. या गाडीतील कल्याणच्या प्रवाशांना उतरण्यासाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबे दिली जातील. तसेच गाडी क्रमांक 22104 आणि गाडी क्रमांक 12102 या दोन गाड्या कल्याण येथे 20 ते 25 मिनिटे थांबवण्यात येतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे ब्लॉक काळात मेल/एक्सप्रेसच्या प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.