
आमदार संजय केळकर यांचे एकला चलो निवडणुका भाजप महानगरपालिकेची निवडणूक अद्यापि जाहीर झालेली नाही. मात्र त्यापूर्वीच ठाण्यात भाजप व शिंदे गटामध्ये चांगलीच जुंपली असून तू तू मैं मै सुरू झाली आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत आमचाच महापौर होणार असल्याचे सांगत शिंदे गटाला खुले आव्हान दिले आहे. भाजप व शिंदे गट राज्यात सत्तेमध्ये असूनही ठाण्याच्या नेत्यांमध्ये मात्र विस्तव जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यात महायुतीतील भाजप आणि शिंदे गटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत तर नाईकांच्याही प्रत्येक टीकेला शिंदे गटाकडून प्रतिउत्तर दिले जात आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पालिका झाली आहे. व शिंदे गट स्वबळावर लढणार की महायुतीत लढणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच आता भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एकला चलो चा.. नारा दिल्याने शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीबाबत संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ही निवडणुक युती करून लढवायची की नाही याचा निर्णय ठाण्याचे प्रमुख नेते एकत्र बसून घेतील. मात्र शहरातील भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आपण स्वतंत्रपणे लढले पाहिजे अशी आहे. जी कार्यकर्त्यांची भूमिका तीच आमची भूमिका आहे. ठाण्याचा महापौर हा भाजपचाच झाला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असून केवळ निवडणुकीसाठी म्हणून नव्हे तर पालिकेच्या स्वच्छ कारभारासाठी आपण स्वतः चौकीदार म्हणून गेली अनेक वर्षे लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पारदर्शी कारभारासाठी समिती नेमा
ठाणे महानगरपालिकेमध्ये पारदर्शी कारभार व्हावा यासाठी नवी समिती नेमा अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी केली आहे. पालिकेतील खाबुगिरी व भ्रष्टाचारावर बोलताना ते म्हणाले की, काही अधिकारी चांगले काम करत असले तरी प्रशासनातील अनेक जणांवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत. त्यातील काही जण तर सध्या तुरुंगात असून आम्ही अनेकदा विधिमंडळात पालिकेच्या कारभाराची चौकशी करा, अशी मागणी केली असल्याचेही केळकर यांनी नमूद केले.