
दिवाळीच्या काळात सुट्टीसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे. प्रवाशांना लुटणाऱ्या खासगी ट्रव्हल्सवर कारवाईसाठी आरटीओ विशेष तपासणी मोहीम राबवणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 3 नोव्हेंबरपर्यंत खासगी पंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी केली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाचे टप्पानिहाय भाडे विचारात घेऊन खासगी पंत्राटी परवाना वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्या अनुषंगाने सर्व प्रादेशिक आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या आहेत. कमाल दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. जादा भाडे मागणाऱ्या वाहनांविरोधात प्रवाशांनी तक्रार करावी, असे आवाहन आरटीओने केले आहे.
या गोष्टींची होणार तपासणी
प्रवासी बसमधून अवैध मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, वाहनामध्ये केलेले बेकायदेशीर फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, अग्निशमन यंत्रणा अशा बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.