
एसटी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी सदावर्ते गट आणि शिंदे गटात तुफान हाणामारी झाली. बॅंकेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाला आणि संचालकांमध्ये जुंपली. त्यानंतर सभागृहात घुसलेल्या 30 ते 35 जणांच्या जमावाने धुडगूस घातला. दोन गटांनी एकमेकांवर बाटल्या फेकल्या, लाथाबुक्क्या मारल्या. त्यात शिंदे गटाचे पाच संचालक जखमी झाले. या राडय़ानंतर शिंदे गटाच्या संचालकांनी नागपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली.
एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात सकाळी एसटी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. सध्या ही बँक सदावर्ते गटाच्या ताब्यात आहे. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या बँकेतील 7 कोटी रुपयांच्या नव्या भ्रष्टाचाराचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. त्यावर सदावर्ते गटाचे संचालक भडकले आणि दोन्ही गट हमरीतुमरीवर आले. त्यातून फ्री-स्टाईल हाणामारीला सुरुवात झाली. एकमेकांवर बाटल्या फेकण्यापासून ते लाथाबुक्क्यांनी तुडवणे, कपडे फाडणे, शिव्या घालणे असा धुडगूस संपूर्ण सभागृहात घालण्यात आला.
यात धीरज तिवारी, वनिता माळी, प्रवीण जाधव, अनिल बनकर, संतोष राठोड हे पाच संचालक जखमी झाले. याप्रकरणी शिंदे गटाने सदावर्ते गटाविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रात्री शिंदे गटाच्या संचालकांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, एसटी सहकारी बँकेतील भ्रष्टाचार आणि बैठकीत घातला गेलेला हैदोस यावर एसटी कामगार वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हाणामारीच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. महामंडळाचे वाहतूक भवन राज्यातील एसटी कामगारांचे श्रद्धास्थान आहे. सरकारने नेमलेल्या शहाजी पाटील समितीने सदावर्तेंच्या संचालक मंडळाकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे. याअनुषंगाने कामगार संघटनांची संयुक्त कृती समिती दिवाळीनंतर आरबीआयवर मोर्चा काढणार आहे. भ्रष्ट संचालक मंडळावर कारवाई का केली जात नाही? आरबीआयवर कोणाचा दबाव आहे याचा जाब विचारणार आहोत.
– संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना