शुभवार्ता! गगनयानचे 90 टक्के काम पूर्ण, इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांची माहिती

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने ऐन दिवाळीच्या धामधुमीत एक आनंदाची बातमी दिली आहे. हिंदुस्थानची महत्त्वाकांक्षी योजना गगनयानचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी गुड न्यूज इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी दिली आहे. गगनयानचे केवळ 10 टक्के काम शिल्लक असून ही मोहीम 2027 च्या सुरुवातीला लाँच केली जाईल, असेही ते या वेळी म्हणाले. सध्या या मोहिमेच्या सर्व तांत्रिक चाचण्या वेळापत्रकानुसार केल्या जात आहेत.

व्ही. नारायणन गगनयान मोहिमेची माहिती देताना म्हणाले की, रॉकेटची मानवी रेटिंग प्रक्रिया, ऑर्बिटल मॉड्यूलची रचना आणि गगनयानसाठी पर्यावरण नियंत्रण प्रणाली जवळ जवळ पूर्ण झाली आहे. हे एक अभियान आहे आणि त्यासाठी अनेक जटिल तंत्रज्ञान विकसित करावे लागले. तीन क्रूशिवाय मोहिमा पूर्ण करायच्या आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतरच अंतराळवीर पाठवले जातील. पहिल्या क्रूशिवाय मोहिमेत ‘व्योमित्र’ नावाचा एक मानवीय रोबोट असेल. आम्ही 2027 च्या सुरुवातीला मानवासह मोहीम सुरू करण्याचे ध्येय ठेवत आहोत, असेही ते या वेळी म्हणाले. इस्रोने काही महिन्यांपूर्वीच पहिली इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली. ही चाचणी गगनयान मोहिमेसाठी डिझाइन केलेल्या पॅराशूट सिस्टमची वास्तविक परिस्थितीत पडताळणी करण्यासाठी घेण्यात आली. गगनयान मोहीमपूर्वी पॅराशूट तैनात करण्याची प्रक्रिया पडताळणे हा यामागील उद्देश होता.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षाच्या अखेरपर्यंत दोन उपग्रह लाँच केले जाणार आहेत. पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये एलव्हीएम-3 एम5 मिशन अंतर्गत सीएमएस-03 (जीसॅट-7आर) उपग्रह लाँच करणार आहे. यानंतर अमेरिकी कंपनीचे 6.5 टन वजनी संचार उपग्रह ब्लूबर्ड-6 लाँच केले जाईल. नासा-इस्रोच्या संयुक्त मिशन निसारचे कॅलिब्रेशन सुरू आहे. ते पुढील 10 ते 15 दिवसात सक्रीय होईल.

गगनयान मोहीम का आहे महत्त्वाची?

गगनयान मोहीम रशिया, अमेरिका आणि चीननंतर हिंदुस्थान मानवाला अंतराळात पाठवणारा चौथा देश ठरेल. या मोहिमेनंतर अंतराळातून सौर मंडळाच्या इतर पैलूंवर संशोधनाचा मार्ग मोकळा होईल. हिंदुस्थानला स्वतःचे अंतराळ स्थानक बांधण्याच्या प्रकल्पात मदत मिळेल. संशोधन आणि विकास क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. गुंतवणूक वाढेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अंतराळ उद्योगात काम करणाऱ्या इतर देशांसोबत एकत्र काम करण्याची संधी मिळेल. गगनयान मोहिमेसाठी रॉकेट तयार आहे आणि अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू आहे.