
कोकण आणि घाटावरील भाजी विक्रेते उरलेला सर्व कचरा आंबेनळी घाटातील रस्त्याच्या कडेला फेकत आहेत. भाजीच्या व्यापाऱ्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून आंबेनळी घाटात सडलेल्या भाजीपाल्याचा खच पडला आहे. सर्वत्र कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून पर्यटकांना नाकाला रूमाल लावून प्रवास करावा लागत आहे. हा घाट आहे की डम्पिंग ग्राऊंड, असा प्रश्न पर्यटकांना पडला आहे.
वाई भाजी मंडईतून सकाळी मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी करून व्यापारी दररोज घेऊन जातात. वाई येथील भाजी मंडई सकाळी लवकर भरत असल्यामुळे सर्व वाहने मध्यरात्रीच या घाटातून प्रवास करतात. याचाच फायदा घेऊन व्यापारी उरलेला आणि सडलेला भाजीपाला आंबेनळी घाटात टाकतात. रान कडसरी, कापडे खुर्द व देवळे ग्रामपंचायत हद्दीतील दाभिल टोकनजीक पोलादपूर – महाबळेश्वर रस्त्यावर आंबेनळी घाटातील प्रत्येक वळणावर सडलेल्या भाज्यांचा सडा पडला आहे. त्यामुळे संपूर्ण घाटात कुजलेल्या भाजीपाल्यांचे ढिगच्या ढिग साठलेले दिसतात.
परिस्थिती जैसे थे…
आंबेनळी घाटात दोन वर्षांपूर्वीही कचऱ्याचे ढीग पसरले होते. याची दखल घेऊन हरोशी ग्रामपंचायत आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण घाट स्वच्छ केला. त्यानंतर अनेक महिने घाट परिसरात कचरा टाकत नव्हते. मात्र आता पुन्हा जागोजागी कचऱ्याचे ढिग पसरले असल्याने परिस्थिती जैसे थे झाली आहे. हा कचरा अनेकदा घाटातील माकडे खात असल्याने वन्यजीव प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या भाजी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी प्राणीमित्रांनी केली आहे.





























































