
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते,खासदार संजय राऊत यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. ”परिवारवाद हा फक्त राजकारणात नाही तर आपल्या पदाचा वापर करून कर्तृत्वशून्य मुलाला पदावर बसवणं त्यालाही परिवारवाद म्हणतात”, असा टोला त्यांनी अमित शहा व जय शहा यांना यांना लगावला.
”अमित शहा हे राजकारणात फार उशीरा आले. ते व्यापारी म्हणून राजकारण करत आहे. देशाशी, समाजाशी त्यांचा काही संबंध नाही. त्यांनी भाजपात एक व्यापारी वृत्तीची पिढी तयार केली. मुलाला क्रिकेटमध्ये टाकून त्यांनी क्रिकेट ताब्यात घेतलंय. परिवारवाद हा तिथून सुरू आहे. परिवारवाद फक्त राजकारणात नसतो. आपल्या पदाचा वापर करून कर्तृत्वशून्य मुलाला पदावर बसवणं त्यालाही परिवारवाद म्हणतात”, असे संजय राऊत म्हणाले.
अमित शहा यांनी मुंबई दौऱ्याच्या वेळी केलेल्या कुबड्याबाबत केलेल्या वक्तव्याचा देखील संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. ”फडणवीस अमित शहांच्या वक्तव्यावर सारवासारव का करत आहेत? अमित शहा स्पष्टपणे मित्रांना कुबड्या बोलले आहेत. या अपमानानंतर अजित पवार आणि शिंद्यांनी सरकारमधून बाहेर पडायला हवं. स्वाभिमानाची थोडी तरी ठिणगी पेटत असेल तर काल अमित शहांनी त्यांचा जो काही कुबड्या असा उल्लेख केला त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला हवं, असेही संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, या देशात लोकशाही आहे. एक वेळ अशी होती की भाजपला दुर्बिनीतून शोधावा लागत होतं आमच्या सारख्या लोकांनी भाजपचं अस्तित्व निर्माण केलं. एक वेळ अशीही येईल की भाजप दुर्बिनीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही. हे भाकित नाही. सत्य आहे. राजकारणात चढ उतार होत असतात. अशी भाषा वापरणारे या देशाच्या मातीतच गाडले गेले आहेत. अमित शहा सर्वेसर्वा नाही. लोकशाहीचे मालक नाही. जो माणूस देशाच्या लोकशाहीतील विरोधी पक्ष संपवून टाकू असं म्हणतो तो मूर्ख. या देशात विरोधी पक्ष राहिलं. विरोधी पक्ष लोकशाहीची गरज. लोकसभेत राहुल गांधी आहेत म्हणून जनतेचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतोय. आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केलाय म्हणून तुम्ही उघडे पडताय. विरोधी पक्षाला बघून तुम्ही चळाचळा कापताय. अमित शहांच्या वक्तव्यातून ते स्पष्ट होतंय. इदी आमीन प्रमाणे हे लोकशाही संपवायला निघाले आहेत.
, असेही संजय राऊत म्हणाले.
”पराभव हा भाजपला दिसू लागला आहे. त्यांच्या व्होटचोरीला आम्ही जो बूच लावतोयय त्यामुळे त्यांना पराभव दिसतोय. आम्ही लोकशाहीची बूज राखतोय. ते पराभूत मनस्थितीत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपकडे पोस्टर लावायलाही माणसं नव्हती
”महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीत यांच्याकडे पोस्टर लावायला यांच्याकडे माणसं नव्हती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की भाजपचंही काम केलं पाहिजे. कुबड्या कुबड्या काय सांगता? बाबरीनंतर आम्ही देशभरात निवडणूका लढणार होतो. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, बिहार अशा 65 ठिकाणी निवडणुका लढणार होतो. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची देशभरात लाट होती. त्यावेळी अटलजी व आडवाणीजी यांनी बाळासाहेबांना विनंती केली की तुम्ही निवडणुका लढल्या तर हिंदुत्वात फूट पडेल, भाजपचं नुकसान होईल. तेव्हा बाळासाहेबांनी आम्हाला माघार घ्यायला लावली नाहीतर त्यांना कुबड्या काय असतं ते कळलं असतं”, असे संजय राऊत म्हणाले






























































