
दर्जेदार लेखकांच्या साहित्याने नटलेल्या ‘कालनिर्णय’ च्या दिवाळी अंकाचे नुकतेच शानदार प्रकाशन झाले. ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी 2025’ चे 33 वे वर्ष आहे. निसर्ग, कला, पर्यटन, मनोरंजन, इतिहास, साहित्य तसेच इतर विविध विषयांवरील वाचनीय लेख हे यंदाच्या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
अंकात (निवृत्त) कमोडोर डॉ. श्रीकांत केसनूर यांचा 1946 सालच्या नौदलातील उठावावरील ‘स्वातंत्र्यलढ्यातील विस्मृतीत गेलेले पान’ हा लेख, मुरली रंगनाथन लिखित ‘आँध संस्थानचा प्रिंटिंग प्रेस बहुआयामी आणि कलात्मक लिथोप्रेस’ आणि दीपक घारे यांचा ‘जावजी दादाजींचा निर्णयसागर प्रेस’ लेख आहे. शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे युनिवर्स हा फॉण्ट डिझाईन करणारे ऑड्रियन फुटिगर यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला आहे विनय सायनेकर यांनी, तर ‘द इकॉनॉमिस्ट’च्या संपादकांची कारकीर्द वाचकांसमोर आणली आहे ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी ‘पत्रकार ते अर्थतज्ञ जेम्स विल्सन’ या लेखातून.
निसर्ग विभागातून वन्य प्राणी आणि पाखरांचे गूढरम्य आणि अद्भुत कामविश्व सुरेशचंद्र वारघडे यांनी ‘मधुमीलनात ह्या…’ या लेखातून मांडले आहे. प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?’ या लेखातून विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशासम्राज्ञीपर्यंतचा प्रवास मांडला आहे. डॉ. शरद वर्दे यांचा ‘युरोपची होरपळ’, तर दिग्दर्शक डेव्हिड फिचर यांचा सिनेप्रवास मांडणारा मेहेंद्र तेरेदेसाई यांचा लेख आहे. याशिवाय नाटककार गंगाराम गवाणकर लिखित ‘कावळोवा’ ही कथा अंकात आहे. याशिवाय अनेक लेख, कथा, विनोदी किस्से, कवितांनी अंक सजलेला आहे. पाकनिर्णय 2026 च्या परीक्षकांचे अनुभवही अंकात वाचता येतील, अशी माहिती ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी’चे संपादक जयराज साळगावकर यांनी दिली.





























































