
कुख्यात गुंड गजा मारणेचा जवळचा साथीदार आणि मागील नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या रूपेश मारणेला कोथरूड पोलिसांच्या पथकाने अखेर अटक केली. मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील एका बंगल्यात तो लपून बसला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास वेढा घालून त्याला अटक केली.
संगणक अभियंता तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणात फेब्रुवारी 2025 रोजी गजानन मारणे व त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर रूपेश मारणे फरार झाला होता. पोलिसांनी राज्यातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवूनही तो सापडत नव्हता. अखेर मुळशीतील आंदगाव येथे तो राहत असल्याची माहिती कोथरूड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने पहाटे बंगल्याभोवती सापळा रचला. त्यानंतर रूपेश मारणे याला ताब्यात घेतले.




























































