
छठ पूजेसाठी गेलेले दोन तरुण रायते नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी घडली. प्रिन्स गुप्ता आणि राजन विश्वकर्मा अशी तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे गुप्ता, विश्वकर्मा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रिन्स गुप्ता आणि राजन विश्वकर्मा हे दोन तरुण नदीकाठी आले. त्याचवेळी यातील एक तरुण पाय घसरून नदीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या तरुणाने नदीत उडी मारली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. याची माहिती स्थानिकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. टिटवाळा पोलिसांसह कल्याण तालुका पोलीस, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदीत शोधमोहीम राबवली. अंधारामुळे ती थांबवण्यात आली. आज सकाळी पुन्हा सात वाजल्यापासून बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र अद्यापही तरुणांचा ठावठिकाणा लागलेला नाही.






























































