ब्रिटनच्या राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर, किंग चार्ल्स यांनी भावाला राजवाड्यातून बाहेर काढले; अँड्रय़ू यांची प्रिन्स पदवीही काढून घेतली

एकेकाळी जगातील शक्तीशाली आणि श्रीमंत असलेल्या ब्रिटनच्या राजघराण्यातील वाद आता चव्हाटय़ावर आला आहे. ब्रिटनचे किंग चार्ल्स यांनी त्यांचे धाकटे भाऊ अँड्रय़ू यांच्याकडून प्रिन्स (राजकुमार) पदवी काढून घेतली. अँड्रय़ू यांना बेदखल करून राजवाडय़ातून बाहेर काढले आहे.

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणारा अमेरिकन गुन्हेगार जेफ्री ऐपस्टाईनशी अँड्रय़ू यांचे संबंध उघडकीस आले होते. तसेच व्हर्जिनिया गिफ्रे या महिलेचे लैंगिक शोषण केल्याचाही अँड्रय़ू यांच्यावर आरोप आहे. या आरोपांमुळे ब्रिटनच्या राजघराण्याने अँड्रय़ू यांच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. किंग चार्ल्स यांनी आज अँड्रय़ू यांना बेदखल करताना त्यांची राजघराण्यातून हकालपट्टी केली.

‘डय़ूक ऑफ यॉर्क’ पदवी काढून घेतली

बकिंगहॅम पॅलेसमधून अँड्रय़ू यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्याकडे असणाऱया सर्व शाही पदव्याही काढून घेतल्या. आतापर्यंत ‘प्रिन्स अँड्रय़ू डय़ुक ऑफ आर्क’ म्हणून त्यांना ओळखले जात होते. यापुढे अँड्रय़ू माऊंटबॅटन विंडसर म्हणून त्यांची ओळख असणार आहे.

लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱया व्हर्जिनियाची आत्महत्या

2011 मध्ये व्हर्जिनिया गिफ्रे या महिलेने अमेरिकेतील एका हाय प्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून जगभरात खळबळ उडवून दिली होती. व्हर्जिनियाने तिच्यावर 15 वर्षांपासून झालेल्या लैंगिक शोषण आणि तस्करीची माहिती जगासमोर ठेवली. 17 वर्षांची असताना अँड्रय़ू यांनी लैंगिक शोषण केल्याचाही आरोप केला. एप्रिल महिन्यात तिने आत्महत्या केली.

खासगी निवासस्थानी व्यवस्था

अँड्रय़ू बकिंगहॅम पॅलेसमध्ये राहू शकणार नाहीत. ते खासगी निवासस्थानी जातील. ब्रिटनचे नागरिक म्हणून त्यांना कायदेशीर संरक्षण दिले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

मुलींच्या शाही पदव्या कायम

अँड्रय़ू यांची पत्नी सारा फर्ग्युसन यांनाही बकिंगहॅम पॅलेसमधून बेदखल केले आहे. मात्र अँड्रय़ू यांच्या मुलीच्या शाही पदव्या कायम ठेवल्यामुळे त्या पॅलेसमध्ये राहू शकतील.