
पवई येथे ऑडिशन घेणाऱ्या 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. मात्र हा एन्काऊंटर बनावट असून न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी व ‘स्युमोटो’ याचिका दाखल करावी, अशी मागणी करत वकील नितीन सातपुते यांनी हायकोर्टाला पत्र लिहिले आहे.
रोहितचा एन्काऊंटर हे सरकारचे अपयश असून सरकारने रोहितचे दोन कोटी थकवले तसेच रोहितने मुलांचे अपहरण करण्यामागे काहीतरी ठोस कारण असू शकते. तसेच रोहित आर्याचा एन्काऊंटर करताना पोलिसांनी त्याच्या छातीवरच गोळी का झाडली?, पायावर गोळी का नाही झाडली? असे प्रश्न उपस्थित करत अॅड. नितीन सातपुते यांनी एन्काऊंटरबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तथ्ये बाहेर येण्यासाठी न्यायालयाने दखल घेत ‘सुमोटो’ याचिका दाखल करून घ्यावी, अशी मागणी करत हायकोर्टाला पत्र लिहिले आहे. रोहितच्या बनावट एन्काऊंटरला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.




























































