
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. प्रचंड उकाडय़ाचा महिना मानला जाणाऱया ऑक्टोबरमध्ये जोरदार हजेरी लावणारा पाऊस नोव्हेंबर महिन्यातही लवकर थांबण्याची चिन्हे नाहीत. मुंबईत 7 नोव्हेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
गेल्या आठवडय़ापासून मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळी कुलाबा, फोर्ट, लालबाग, परळ, भायखळा, दादर या शहर परिसरासह उपनगरांत वांद्रे, अंधेरी, भांडुप, जोगेश्वरी, पवई, बोरिवली, कांदिवली, घाटकोपर, चेंबूर आदी भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. अधूनमधून विश्रांती घेत अनेक भागांत पावसाने मुसळधार बरसात केली. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तसेच दक्षिण हिंदुस्थानातून आलेले ईशान्य मोसमी वारे यांचा परिणाम वातावरणावर झाला आहे. त्यामुळे किनारपट्टीलगत असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पुढील पाच दिवस पावसाची हीच परिस्थिती ‘जैसे थे’ असेल, असे हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी सांगितले. त्यामुळे ऑक्टोबरपाठोपाठ नोव्हेंबर महिनाही पाण्यात जातोय की काय, अशी चिंता मुंबईकरांना सतावत आहे.
समुद्रकिनारी मुंबईकरांची गर्दी
रविवारी सुट्टीच्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळल्याने नोकरदार मंडळींचा मुंबईबाहेर फिरायला जाण्याचा बेत फिस्कटला. शाळकरी मुलांच्या दिवाळी सुट्टीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी आपल्या मुलांना घेऊन मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सी फेस, वांद्रे बॅण्डस्टॅड, वर्सोवा समुद्रकिनारी गर्दी केली होती.
16 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईव्यतिरिक्त राज्यातील एकूण 16 जिह्यांना पावसाचा ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये रायगड, जळगाव, जालना छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.



























































