ताजं म्हावरं लय लय भारी…! वरळी कोळी महोत्सवात खवय्यांची तुडुंब गर्दी, कोळी भगिनींच्या स्टॉल्सवर रांगा

शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने वरळी सागरी कोळी महोत्सव समितीमार्फत आयोजित कोळी महोत्सवाला मत्स्यप्रेमी खवय्यांनी तुडुंब गर्दी केली. कोळी महिलांनी माशांची झणझणीत प्लेट खवय्यांसाठी उपलब्ध केली. त्यामुळे संपूर्ण महोत्सवात ‘ये दादा आवरं ये… ताजं ताजं म्हावरं खायाला ये’ अशी कोळी महिलांची साद आणि त्यावर ‘ताजं म्हावरं लय लय भारी’ ही खवय्यांनी दिलेली उत्स्फूर्त दाद ऐकायला मिळाली.

वरळी सी फेसवर भरवलेल्या कोळी महोत्सवात कुलाब्यापासून वसईपर्यंतच्या कोळी भगिनींच्या महिला बचत गटाचे 30 स्टॉल्स लागले होते. मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय करणाऱया कोळी समाजातील महिलांनी शिजवलेल्या माशांची चव चाखण्याचा आनंद काही औरच असतो. याच हेतूने मत्स्यप्रेमी मुंबईकर खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शहरात सर्वप्रथम वरळीत कोळी महोत्सव सुरू करण्यात आला. त्या महोत्सवाचे यंदाचे 11 वे वर्ष होते. शुक्रवारी मोठय़ा उत्साहात सुरू झालेल्या महोत्सवाची रविवारी रात्री तितक्यातच उत्स्फूर्त प्रतिसादात सांगता झाली. तीन दिवसांत कोळी भगिनींच्या स्टॉल्सवर माशांच्या झणझणीत प्लेट्सचा आस्वाद घेण्यासाठी लाखो खवय्यांनी गर्दी केली होती. दिवाळीनंतर सुरू होणारा मुंबईतील हा पहिला कोळी सागरी महोत्सव असल्याने प्रत्येक वर्षी वरळीतील कोळी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद लाभतो, अशी माहिती वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि सरचिटणीस आकर्षिका पाटील यांनी दिली.

आदित्य ठाकरेंकडून कोळी महिलांचे कौतुक

वरळी सागरी कोळी महोत्सवाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी रात्री भेट दिली. त्यांनी महोत्सवात सहभागी झालेल्या कोळी महिलांच्या बचत गटाचे भरभरून कौतुक केले. हा महोत्सव कोळी भगिनींचे हक्काचे व्यासपीठ असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोळी भगिनींच्या स्टॉल्ससोबत सेल्फीदेखील काढला. वरळी सागरी कोळी महोत्सव समितीतर्फे आदित्य ठाकरे यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच महोत्सवात सहभागी झालेल्या विविध समाजाच्या लोकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.

प्रत्येक स्टॉलला दोन लाखांचे उत्पन्न

महोत्सवाला खवय्यांकडून मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. यंदाच्या तीन दिवसांत कोळी महिलांच्या प्रत्येक महिला बचत गटाला दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. रविवारी कार्तिकी एकादशी असूनही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खवय्यांची गर्दी झाली होती. महोत्सवाला शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, आशीष चेंबूरकर आदी पदाधिकाऱयांनी भेट दिली आणि कोळी महिलांच्या बचत गटांचे कौतुक केले.

मागाठाणेतील मालवणी महोत्सवाला अलोट प्रतिसाद
शिवसेना विभाग क्र. 1 मधील शाखा क्र. 12 आणि 14 यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मागाठाणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित मालवणी महोत्सवाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी भेट दिली. महोत्सवात उभारण्यात आलेल्या श्री वेताळ देव मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर महोत्सवाला संबोधित करताना कोकणातील कला, संस्कृती आणि खाद्यपरंपरेचा प्रसार मुंबई उपनगरात सातत्याने करणाऱया मागाठाणे मित्र मंडळाचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना नेते-आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर, माजी आमदार विलास पोतनीस, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभाग संघटक शुभदा शिंदे उपस्थित होते.