बेकायदा पार्किंगचा बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला अडथळा, रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस आणि पालिकेला पत्रव्यवहार

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेसना उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगचा मोठा अडथळा ठरत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस १२ मीटर लांबीच्या असल्याने पार्किंगच्या अडथळ्यातून या गाड्या चालवण्याचे आव्हान बनले आहे. याअनुषंगाने अंतर्गत रस्त्यांवरील बेकायदा पार्किंग हटवून रस्ते मोकळे करा, अशी विनंती करीत बेस्ट प्रशासनाने पोलीस आणि पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास आरामदायी आणि गारेगार करण्यासाठी नवीन १५० इलेक्ट्रिक एसी बसेसचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढली आहे. नव्या बसेस शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरांतील रस्त्यांवर अधिक धावत आहेत. त्यादृष्टीने गेल्या आठवड्यात बेस्ट उपक्रमाने २३ बसगाड्यांच्या मार्गात बदल केला, मात्र त्या बदलानुसार नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या चालवणे चालकांना आव्हान बनले आहे. उपनगरांतील बहुतांश रस्त्यांवर दुतर्फा बेकायदा पार्क केल्या जाणाऱ्या खासगी वाहनांचे अतिक्रमण आहे. त्या पार्किंगमुळे अंतर्गत रस्त्यांवर आधीच वाहतूककोंडी होत होती. त्यात १२ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसेस चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बस वळणावर मागील भागात दुसऱ्या गाडीला घासण्याची भीती आहे. त्यामुळे विविध आगारांतून स्थानिक पातळीवरील पोलीस ठाणी आणि पालिका प्रभाग कार्यालयांना पत्रव्यवहार केला जात आहे.

उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांवरील बेकायदा पार्किंग आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही पोलीस आणि पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. नव्या इलेक्ट्रिक बसेसची लांबी जास्त असल्याने चालकांना गाड्या चालवताना खूप सावधगिरी बाळगावी लागत आहे. पार्किंग आणि फेरीवाल्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

चालकांना दंडात्मक कारवाईची भीती

इलेक्ट्रिक बसेसच्या देखभालीचाही प्रश्न आहे. १२ मीटर लांबीच्या बसगाड्या चालवताना चालकांना प्रचंड सावधानता बाळगावी लागत आहे. रस्त्यांवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण, फुटपाथअभावी रस्त्यांवर चालणारे पादचारी आणि पार्किंगमधून वाट काढत बस चालवावी लागत आहे. अशा स्थितीत बस कुठेही घासली तर साडेतीन ते पाच हजारांपर्यंत दंड भरावा लागतो. आम्हाला या दंडात्मक कारवाईची भीती सतावत आहे, असे एका चालकाने सांगितले.