
भाजपचे नेते व मंत्री ऍड. आशीष शेलार यांनी मतचोरीच्या मुद्दय़ावर सोमवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मनसेसह विरोधकांवर टीका करत मुस्लीम दुबार मतदारांबाबत प्रश्न उभे केले होते. यावरून नकळत आशीष शेलार यांनी दुबार मतदार असल्याचे मान्य केले असल्याची टीकाही विरोधकांनी केली. दरम्यान आज म्हणजेच मंगळवारी 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत असून यात जिल्हा व मनपा निवडणूकांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेबाबत ट्विट करत भाजप व आशिष शेलार यांना काही प्रश्न केले आहेत. ”प्रश्नपत्रिकेत घोळ असेल तर परीक्षा घेणे योग्य आहे का ? प्रश्नपत्रिका बदलायची की नाही ? काल पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांचा घोळ असल्याचा आरोप करणारी भाजपा आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला विरोध करेल का ? मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेण्याची भूमिका बोलघेवड्या भाजपला मान्य आहे का ? किमान आशिष शेलार साहेबांनी तरी भूमिका घ्यावी? असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
            
		





































    
    























