वर्ल्डकप जिंकल्यानंतर महिला खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू वाढली, जेमिमाने मानधन केले डबल

हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंनी तब्बल 47 वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर अखेर विश्वचषक जिंकला. टीम इंडियाच्या या विजयानंतर महिला खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे. बीसीसीआयने देखील टीम इंडियाला 50 कोटींचे बक्षिस जाहीर केले आहे. या विजयानंतर संघातील खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये चांगलीच वाढली आहे. संघातील सर्व खेळाडूंनी त्यांच्या ब्रँड एन्डोर्समेंट फी 25 ते 100 टक्क्यांनी वाढ केली आहे.

सध्या ब्रँडिंगच्या बाबतीत जेमिमा रॉड्रिग्ज ही आघाडीवर असून तिने तिच्या मानधनात दुपटीने वाढ केली आहे. तिच्यासोबतच स्मृती मनधना, हरमनप्रीत कौर, दीप्ति शर्मा, शेफाली वर्मा यांनी देखील त्यांचे मानधन वाढवले आहे. या विजयाचा परिणाम या क्रिकेटपटूंना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही दिसून आला आहे. टीम इंडियातील सर्व महिला खेळाडूंच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सध्या जेमिमा रॉड्रिग्ज ही एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी 75 लाख ते दीड कोटीपर्यंत मानधन घेत आहे. तर स्मृती मनधाना ही देशातील सर्वाधिक मानधन घेणारी महिला खेळाडू असून सध्या तिच्याकडे 16 ब्रँड्स आहेत. स्मृती एका ब्रँडसाठी 1.5 ते 2 कोटी घेत आहे.