
अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा सामना करीत जिल्ह्यात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. एक नोव्हेंबरपासून गाळपाला सुरुवात झाली असली, तरी अद्यापि गती आलेली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 3751 रुपये विना कपात आणि गतवर्षीचे 200 रुपये देण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. हंगामाच्या सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार 3400 ते 3500 रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर करू लागले आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी यंदाच्या दराबाबत भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात निवडणुकीपूर्वी संघर्ष अटळ असल्याचे चित्र दिसत आहे.
चालू वर्षी मे महिन्यांपासून अतिवृष्टी आणि पाऊस होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पावसाचा खंड पडलेला नाही. यंदाचा साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी पाऊसही थांबायला तयार नाही. यंदा सातत्याने पाऊस होत असल्याने राज्य सरकारने ऑक्टोबरऐवजी 1 नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. अद्यापही गाळपास म्हणावी तशी गती आलेली नाही. येत्या काही दिवसांत पावसाने उसंत दिल्यास जिल्ह्यातील कारखान्यांचे जोमाने गाळप सुरू होईल, असे चित्र आहे. याशिवाय राज्यात काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू होत असताना ऊसदराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
सांगली जिल्ह्यात सहकारी आणि खासगी मिळून 17 साखर कारखाने आहेत. गतवर्षी गेलेल्या उसाला कारखान्यांनी एफआरपीनुसार बिल दिले आहे. कुणी 3100 रुपये, तर कुणी 3200 रुपये बील दिले आहे. ऐन दिवाळीतही कारखान्यांकडून ऊस बिलाची अंतिम रक्कम वर्ग करण्यात आली होती. जिल्ह्यात गतवर्षी म्हणजे 2024-25 गाळप हंगामात 1 लाख 43 हजार हेक्टरवरील उसाचे गाळप करण्यात आले होते. यंदा गाळपास सुमारे 1 लाख 38 हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे.
मे महिन्यापासून होत असलेली अतिवृष्टीसह कोयना आणि चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेली होती. हजारो हेक्टरवरील ऊस पाण्याखाली गेला. जिल्ह्यात सर्वाधिक साडेचार हजार हेक्टरवरील उसाचे नुकसान झाले. त्यानंतर पुराचे पाणी कमी झाल्यानंतरही शेतात महिनाभर पाणी साचून राहिले. याशिवाय अधूनमधून पावसाचे सरी पडत आहेत. अति पावसामुळे उसाची वाढ झालेली नाही. अशातच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे.
उसाला प्रतिटन 3751 रुपये हवेत – राजू शेट्टी
– यंदा गाळपास जाणाऱ्या उसाला प्रतिटन 3751 रुपये आणि गतवर्षीचे प्रतिटन 200 रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मागील सहा महिन्यांपासून साखरेचे भाव वाढले आहेत. मात्र, कारखानदार गतवर्षीचे उर्वरित पैसे द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटनांना ऊसदरासाठी रस्त्यावरची लढाई करावी लागणार असल्याचा इशारा दिला.
कारखानदार, शेतकरी संघटना संघर्ष पेटणार
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी गाळपास जाणाऱऱ्या उसाला 3751 रुपये व गतवर्षीचे 200 रुपये देण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार 3400 ते 3500 रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर करू लागले आहेत. सोनहिरा साखर कारखाना 3300 रुपये पेक्षा जादा दर देईल, असे काँगेसचे नेते व आमदार
विश्वजित कदम यांनी जाहीर केले आहे. मात्र, सांगली जिल्ह्यातील अन्य एकाही कारखानदाराने ऊसदराबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. हा दर कोल्हापूर जिल्ह्याच्या तुलनेत कमी असल्याचे स्पष्ट झाले. यंदा कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष अटळ असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा किती भाव मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






























































