
सोलापूरच्या अंजलीबाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रिलस्टार. त्यांच्या या रिअल लाईफची दखल साऊथच्या सिनेमाने घेतली आहे. या दोघांच्या प्रेमकहाणीवर साऊथचा सिनेमा येत आहे.
सोलापूरचे अंजली बाई शिंदे आणि आकाश नारायणकर खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत. हे एक साधारण कपल आहे. जे काही वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून अपलोड करायचे. त्यांचे आयुष्य सुखा समाधानाचे सुरू असताना एक दिवस अंजलीला ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले आणि दोघंही हादरून गेले. अंजलीबाईला एक छोटा अपघात झाला होता. त्यात तिला डोक्याला सहा टाके पडले होते. या अपघातावेळी तिचे एक्सरे आणि एमआरआय केला असता तिच्या मेंदूला गाठ असल्याचे समजले. ही गाठ लहानपणापासून होती. जवळपास सर्वच डॉक्टरांनी अंजलीची आशा सोडली होती. मात्र, तिच्या नवऱ्याला हार मानली नाही. त्याचा प्रेमावर आणि स्वामीकृपेवर अपार विश्वास होता. त्याने नव्या उमेदिने प्रयत्न केले आणि डॉक्टरांनी अंजलीबाईवर शस्त्रक्रिया करून ती गाठ काढली. पण यात तिला अर्धांगवायूचा झटका आला आणि शरीराची एक बाजू निकामी झाली.
आकाशने तिची साथ कधीच सोडली नाही. त्याने तिची अहोरात्र सेवा केली आणि आता ती बरी होत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी ते आई-बाबा होत असल्याची गुडन्यूजही दिली. त्यांची ही कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेसारखीच आहे. साऊथच्या सिनेमाला त्यांच्या खऱ्या आयुष्याची भुरळ पडली. त्यांनी त्यांच्या या खऱ्या आयुष्यावर ‘लव्ह यू मुद्दू हा सिनेमा केला आहे. साऊथचा अभिनेता सिद्दू आणि अभिनेत्री रेश्मा सिनेमाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गुरुवारी 7 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.






























































