
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गुरुवारी सायंकाळी रेल्वे कर्मचाऱयांनी पुकारलेले आंदोलन आणि त्यानंतर सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ लोकलच्या धडकेत दोघा प्रवाशांचा झालेला मृत्यू या घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ऐन गर्दीच्या वेळेस लाखो प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या तसेच प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रेल्वे कर्मचारी संघटनेवर कठोर कारवाई करा, जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली आहे.
गुरुवारी सायंकाळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघ या संघटनेच्या रेल्वे कर्मचाऱयांनी सीएसएमटी स्थानकात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले. मुंब्रा अपघात प्रकरणातील रेल्वे अभियंत्यांविरोधातील एफआयआर मागे घेण्याच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरल्यामुळे शुक्रवारी प्रवासी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला. आंदोलनाचा लोकल सेवेवर परिणाम झाला आणि त्यादरम्यान नाहक बळी गेलेल्या प्रवाशांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते उमेश विशे यांनी केली. प्रवाशांना वेठीस धरून प्रश्न सुटणार नाहीत. असे असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आंदोलन केले आणि दोन प्रवाशांचे बळी गेले. प्रवाशांच्या मृत्यूला आंदोलन करणारी संघटनाच जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली.
प्रवाशांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे कर्मचाऱयांनी ऐन गर्दीच्यावेळी केलेल्या आंदोलनाचा फटका असंख्य कर्मचाऱयांना बसला असून या गोंधळानंतर सुटलेल्या लोकलने पाच जणांना उडवले. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत एका वकिलाने हायकोर्टाला याबाबत पत्र लिहिले आहे.




























































