
>> अभय मिरजकर
माणूस प्रतिष्ठान लातूरद्वारा संचालित माझं घर या प्रकल्पातील मुलांना सोबत घेऊन या प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष शरद झरे यांनी लातूर जिह्यातील 9 तालुक्यांतील सर्व तालुका ठिकाणे तसेच प्रवासाच्या मार्गावर येणाऱया गावांना भेटी देऊन प्लास्टिक तसेच फटाक्यांचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती केली. 40 गावांनी 2026 ची दिवाळी फटाकेमुक्त करण्याचा संकल्प करून या चिमुकल्या मुलांचे अनुकरण करण्याचे वचन दिले. तसेच प्लास्टिकचा वापर मर्यादित करून प्लास्टिक गावात कुठेही टाकणार नसल्याचे अभिवचनही या वेळी दिले. माझं घर प्रकल्पात शरद झरे हे गेली 7 वर्षांपासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतात. फटाकेमुक्त दिवाळी, प्लास्टिकमुक्त परिसर, पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन ही संकल्पना घेऊन ही सायकल संवाद यात्रा लातूर जिल्ह्यात काढण्यात आली. प्लास्टिकमुक्त लातूर अभियान, फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणीय जीवनशैलीसाठी जनजागृती करणे हा या सायकल संवाद यात्रेचा मुख्य हेतू होता.
केवळ जनजागृती न करता यानिमित्ताने औसा येथील भुईकोट किल्ला, खरोसा लेणी परिसर, हत्ती बेट, उदगीरचा किल्ला या परिसरात स्वच्छतेची प्रत्यक्ष कृती करून परिसरातील प्लास्टिक जमा करत येथील स्वच्छताही करण्यात आली. या सायकल संवाद यात्रेमधून 9 तालुक्यांतील 100 गावांना भेटी दिल्या, या सर्वांची मोठी उपलब्धी म्हणजे तब्बल 40 गावांचा प्लास्टिकमुक्त गाव तसेच फटाकेमुक्त दिवाळी 2026 चा संकल्प करून घेण्यात आला. या फटाकेमुक्त गावांमध्ये फटाक्यांच्या वाचवलेल्या पैशांतून गावात बाल वाचनालय उभारण्याचे ठरले. ज्यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
लातूर जिह्यातील 9 तालुक्यांतून सलग 7 दिवसांत 530 कि.मी. चा सायकल प्रवास यानिमित्ताने करण्यात आला. या सायकल संवाद यात्रेत 12 मुलांचाही सहभाग होता. यानंतर दरवर्षी जिल्ह्यातून सायकल यात्रा काढण्याचा संकल्प करण्यात आला आहे. लातूर शहरातून महिनाभरात किमान एक प्लास्टिकमुक्त शहरासाठी सायकल फेरी काढण्यात येण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून सायकल स्वारांचा ग्रुपही तयार केला जाणार आहे. ज्यामुळे ही संकल्पना जिल्हाभरात राबवली जाईल.


























































