
“मोदी सरकारने देशात एकही संस्था निर्माण केली नाही, उद्योग किंवा शिक्षणासाठी काहीही केले नाही. मात्र त्यांनी सर्व प्रमुख उद्योग आपल्या मित्रांना सोपवले,” अशी टीका काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केली आहे. बिहारमधील बरारीमध्ये निवडणूक सभेतील संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “बिहारची जमीन अदानींना एक रुपया प्रति एकर या दराने देण्यात आली होती. जर तरुणांना एक एकर जमीन दिली असती तर ते त्यांचे भविष्य घडवू शकले असते.”
यावेळी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, “नरेंद्र मोदी येथे विकास, रोजगार किंवा महिला सुरक्षेबद्दल बोलत नाहीत. पण ते पिस्तूल, बंदुका, गोळ्या, खंडणी, खून, अपहरण आणि रक्ताच्या नद्या अशा गोष्टींबद्दल बोलतात. देशाच्या पंतप्रधानांनी असे बोलले पाहिजे का? त्यांना लाज वाटली पाहिजे.”
प्रियांका गांधी म्हणाल्या, “बिहारमधील तरुणांनी सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर योजना सुरू करून त्यांचे स्वप्न भंग केले. एकीकडे येथील तरुण दिवसरात्र मेहनत करतात, भरपूर पैसे खर्च करतात, परंतु पेपर लीकमुळे कुटुंबे आणि तरुण निराश होतात. दुसरीकडे पेपर लीक करणारे पैसे घेतात आणि तरुणांचे भविष्य उध्वस्त करतात. ही एकदाच घडणारी घटना नाही, बिहारमध्ये पेपर लीक सतत घडत आहेत.”



























































