
काशीद समुद्र किनारी सहलीसाठी आलेल्या अकोल्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. आयूष रामटेके व राम खुटे अशी मृत्यू झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी असून बारावीत शिक्षण घेत होते.
आयूष आणि राम हे दोघेही शिक्षक व अन्य १० विद्यार्थ्यांसोबत सहलीला मुरुडच्या काशीद समुद्र किनारी आले होते. संध्याकाळी सर्व विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र भरती-ओहटीमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तीन विद्यार्थी वाहून गेले. अखेर स्थानिकांनी बचावकार्य करत त्या तिघांना बाहेर काढले. मात्र या घटनेत आयूष आणि रामचा मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र आयूष बोबडे याला वाचवण्यात यश आले. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुरुड पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.


























































