‘मातोश्री’वर ड्रोनच्या घिरट्या! कुणाच्या आदेशाने पाळत ठेवली जात आहे?

मुंबईत पोलिसांच्या परवानगीशिवाय आणि रहिवाशांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय ड्रोन उडवण्यास बंदी आहे. असे असताना वांद्रे कलानगर येथील ‘मातोश्री’ निवासस्थानावर आज एक अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळला. त्याने ‘मातोश्री’चा परिसर चारीबाजूंनी न्याहाळला. ‘मातोश्री’च्या खिडक्यांच्या अगदी जवळून हा ड्रोन उडत होता.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान म्हणजे राज्यातीलच नव्हे तर देशातील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांमध्ये गणले जाते. तिथे कडक सुरक्षा व्यवस्थेचा घेरा असतो. आज सकाळी अचानकपणे एक ड्रोन ‘मातोश्री’च्या परिसरात भिरभिरताना दिसला. तो कुठून आला हे तेथील पोलिसांनाही न समजल्याने एकच धावपळ झाली. ‘मातोश्री’च्या आतमध्ये डोकावणाऱ्या या ड्रोनबाबतची माहिती शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी तातडीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट केली. ते वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झकळल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी ‘मातोश्री’वर पोहोचले. शिवसैनिकांचीही कलानगर परिसरात गर्दी झाली.

एमएमआरडीएचे स्पष्टीकरण

हा ड्रोन वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पॉड टॅक्सी योजनेच्या सर्व्हेसाठी असल्याचे स्पष्टीकरण नंतर मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आले. त्यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती, असा दावाही एमएमआरडीएकडून करण्यात आला, तर एमएमआरडीएने परवानगी घेऊन बीकेसी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन उडवले, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.

तत्काळ चौकशी करा – अविनाश जाधव

हे तर अतिशय वाईट आहे. तुम्ही आता खासगी आयुष्यातही हस्तक्षेप करायला लागला आहात. गृहखात्याने याकडे लक्ष द्यावे आता मुसलमानांनी ते ड्रोन उडवले असे म्हणू नका. प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देऊ नका. त्याची तत्काळ चौकशी करावी, असे मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले.

ड्रोनमागे अतिरेकी पार्श्वभूमी नाही ना? – अनिल परब

हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आले? यामागे कोणतेही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना? ‘मातोश्री’सारख्या झेड प्लस सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे शिवसेना नेते, आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी म्हटले आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करून या ड्रोनमागील उद्देश, जबाबदार व्यक्ती आणि त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करावी जेणेकरून शिवसैनिक आणि नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असेही ते म्हणाले.

‘मातोश्री’वर कुणी टेहळणी तर करत नाही ना? – अंबादास दानवे

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या ‘मातोश्री’ निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सेक्युरिटी झोन असलेल्या ‘मातोश्री’च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.’ ‘मातोश्री’वर कोणी टेहळणी तर करत नाही ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दुसऱ्यांच्या घरात वाकून बघू नका ! – वर्षा गायकवाड

भाजपने आधी आमच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप केले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या सरकारच्या विरोधी पक्षांविरुद्ध हेरगिरी करण्याच्या धोरणांचा खुलासा केला होता. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी जिथे कुठे जातात, तिथे यांचे लोक लपूनछपून त्यांचे फोटो काढतात. आज उद्धव ठाकरे यांच्या घरावर ड्रोन उडवून त्यांनी पुन्हा तीच मानसिकता दर्शवली आहे. या सरकारला लाज वाटायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

संपूर्ण बीकेसीसाठी फक्त ‘मातोश्री’चाच सर्व्हे का? ः आदित्य ठाकरे

एमएमआरडीएने एका सर्व्हेसाठी ड्रोन उडवल्याचे सांगितले, मग असा कोणता सर्व्हे आहे जो लोकांच्या घरात डोकावण्याची आणि पकडले गेल्यावर ताबडतोब पळून जाण्याची परवानगी देतो? संपूर्ण बीकेसीसाठी फक्त आमच्या घराचा, ‘मातोश्री’चाच सर्व्हे का? ड्रोन उडवण्यापूर्वी त्याची पूर्वसूचना रहिवाशांना का दिली गेली नाही? असे प्रश्न शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले. त्यांनी हवेत ड्रोन सोडण्यापेक्षा जमिनीवर उतरून त्यांच्या भ्रष्टाचाराचा एक उत्तम नमुना असलेल्या अटल सेतूसारख्या बनावट कामावर लक्ष केंद्रित करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.