सळई डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू, अंधेरी येथील घटना

बांधकामाधीन इमारतीवरून सळई डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. अमर पगारे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

अंधेरी पूर्व परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असल्याने तेथे सिमेंटच्या ब्लॉकची ऑर्डर दिली होती. त्यानुसार आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास एक ट्रक हा तेथे आला. मूळचा नाशिकचा रहिवासी असलेला अमर हा चालकासोबत मदतनीस म्हणून सोबत आला होता. सकाळी ट्रक आल्यानंतर चालक आणि अमर हे दोघे ट्रकमध्ये झोपले होते. झोप झाल्यानंतर अमर हा शौचालयास जाण्यासाठी खाली उतरला. तो शौचालयास जात होता त्याचदरम्यान ट्रकमधील ब्लॉकचे अनलोडिंगचे काम सुरू असताना सातव्या मजल्यावरच्या प्लेटफॉर्मवर ठेवलेली लोखंडी सळई अमरच्या डोक्यात पडली. लोखंडी सळई डोक्यावर पडल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती अमरच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 13) त्याचे नातेवाईक मुंबईत येणार आहेत. त्यानंतर अमरचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी एमआयडीसी पोलीस करत आहेत. विकासकाने कोणत्या सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या त्याची पोलीस माहिती गोळा करत आहेत. अमरच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान गेल्या महिन्यात जोगेश्वरी येथे बांधकामाधीन इमारतीतून ब्लॉक पडल्याने तरुणीचा मृत्यू झाला होता.