
सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱयांची ग्रॅच्युईटी व इतर अंतिम देयके द्या, बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसेस आणा, नोकरभरती करा, कर्मचाऱयांना तत्काळ पदोन्नती सुरू करा तसेच वेतनकराराची थकबाकी यांसारख्या मागण्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करा अन्यथा जानेवारीत ‘वर्षा’ बंगल्यावर ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाईल, अशा इशारा शिवसेना उपनेते, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना दिला आहे.
बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱयांचा मेळावा शिवसेना भवनमध्ये पार पडला. यावेळी बेस्टमध्ये सध्या कार्यरत कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या प्रश्नांबाबत बेस्ट कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली. बेस्ट प्रशासनाने मागील तीन वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या जवळपास 4500 बेस्ट कर्मचाऱयांची ग्रॅच्युईटी आणि अंतिम देयकांची रक्कम थकवली आहे. थकीत ग्रॅच्युईटीची रक्कम 900 कोटींच्या घरात गेली आहे. न्यायालयाने आदेश दिले असतानाही बेस्ट प्रशासन देणी देत नसल्याने कर्मचारी चिंताग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी मेळाव्यात भूमिका मांडली. त्यांनी बेस्ट प्रशासन आणि मुंबई महापालिका आयुक्तांना डिसेंबर अखेरपर्यंतचा अल्टिमेटम दिला. बेस्ट कर्मचाऱयांच्या मागण्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण न केल्यास जानेवारीत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाईल, अशा इशारा अहिर यांनी दिला. यावेळी बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर, प्रमुख मार्गदर्शक गौरीशंकर खोत यांनी मार्गदर्शन केले. तसेच निवृत्त कर्मचाऱयांनीही आपली मनोगते मांडून बेस्ट प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. उमेश सारंग यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. मेळाव्याला शेकडो सेवानिवृत्त बेस्ट कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.
सत्ताधाऱयांनी नाटके बंद करावीत!
बेस्ट चालकांना जेवणासाठी नीट जागा नाही, त्यांच्याकरिता योग्य शेड नाही, प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. बेस्टला विविध समस्यांनी ग्रासले आहे. या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार सचिन अहिर यांनी व्यक्त केला. सत्ताधाऱयांच्या युनियन कर्मचाऱयांच्या प्रश्नावर उपोषण केल्याचे नाटक करतात आणि तिथे सत्ताधारी येऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करून आश्वासन देतात. ही नाटके बंद करून थेट कर्मचाऱयांना ग्रॅच्युईटी व इतर थकीत देयके का दिली जात नाही, असा प्रश्न अहिर यांनी केला.


























































