लोकलच्या गर्दीत महिलांच्या पर्समधील ऐवजांची चोरी, शिताफीने हातसाफ करणाऱ्या महिलेला अटक

लोकलच्या गर्दीत महिलांच्या शोल्डर पर्समधील किमती ऐवज शिताफीने लांबविणाऱ्या एका आरोपी महिलेला रेल्वे गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपी महिला रेकॉर्डवरची गुन्हेगार असून तिच्याकडून 17 लाख 38 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

एक महिला मस्जिद बंदर ते मुलुंड असा लोकलने प्रवास करत असताना तिच्या शोल्डर पर्समधील 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट आणि 500 ग्रॅम वजनाची चांदीची दोन बिस्किटे असा 13 लाख 97 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरण्यात आला होता. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर दुसरी महिला प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकात उतरत असताना तिच्या शोल्डर पर्समधील मनी पर्स चोरण्यात आली होती. त्या मनी पर्समध्ये 50.690 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि पाच ग्रॅम वजनाचे कर्णफूल असे तीन लाख 55 हजार रुपये किमतीचे दागिने होते. या दोन्ही घटनेचे गुन्हे दाखल झाल्यानंतर रेल्वे गुन्हे शाखेचे ठाणे युनिट या गुह्यांचा तपास करत असताना आरोपी आरती दत्ता (37) हिने हे दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.